Logo

सोन्यात गुंतवणूक किती आणि कशी

सोन्यातील गुंतवणूक – भाग २

 

गेल्या लेखात आपण बघितले की सोने हे मूलतः निरुत्पादक असल्यामुळे त्याकडे एक गुंतवणूक पर्याय म्हणून बघणे खरेतर चुकीचे आहे. तरी सुद्धा भारतीयांच्या सोन्याची साठवणूक करण्याच्या सवयीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. जागतिक सुवर्ण मंडळाच्या अंदाजाप्रमाणे भारतीयांनी आतापर्यंत तब्बल २४००० टन सोन्याचा साठा करून ठेवला आहे, जो दरवर्षी वाढतोच आहे. तुलना करायची झाल्यास अमेरिकेच्या फेडरल रिझर्व कडे ८१३३ टन सोने आहे तर भारतीय रिझर्व बँकेकडे केवळ ६०७ टन सोने आहे. भारतीय घरगुती सोनेसाठा जगातील अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, चीन, रशिया इत्यादी १२ देशांच्या एकत्रित सरकारी सोनेसाठ्या एवढा प्रचंड आहे.

आपल्याकडे सोन्याला एक खात्रीची, सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यातले पैसे कधी बुडणार नाहीत यावर लोकांचा विश्वास – नव्हे श्रद्धा – असते. आणि खरोखरी घरातले सोने विकायला काढणे ही अतिनामुष्कीची गोष्ट मानली गेल्यामुळे आपला विश्वास योग्य आहे किंवा नाही तपासून बघण्याची वेळ बहुतांशी येत नाही. जर कधी अशी वेळ आलीच तर मधे असंख्य वर्षं निघून गेलेली असतात आणि इतर दगडधोंड्यांप्रमाणे सोन्याच्याही किमती वर गेलेल्या दिसतात आणि मग आपला विश्वास अजूनच पक्का होतो.

एक गोष्ट खरी आहे की सोन्यात प्रदीर्घ काळ मूल्य जतन करण्याचा गुणधर्म आहे. सोन्याचे मूल्य चलनवाढीच्या वाळवीपासून सदैव सुरक्षित राहू शकते. म्हणजेच सोन्याच्या किमती महागाईच्या दरानुसार वाढत असतात. तसेच जागतिक किंवा राष्ट्रीय पातळीवर अस्थिरता किंवा अनिश्चितता निर्माण झाल्यास सोन्याचे भाव वाढतात. गेल्या लेखात म्हटले होते की १९८० ते २०१९ या काळात भारतातील सोन्याच्या किमती सरासरी वार्षिक ९.१% ने वाढल्या – या काळातील सरासरी महागाई ८-८.५% होती.

भारतात सोन्याला रोखता (Liquidity) देखील प्रचंड आहे. आपण कधीही, कुठेही आपल्याकडच्या सोन्याचे पैशात रुपांतर करून घेऊ शकतो. सोने कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मूल्य ग्रहित करून ठेवू शकते. म्हणजे ३० लाख रुपये चलनाच्या स्वरुपात बरोबर वागवण्यापेक्षा एक किलो सोने सोपे पडते. मात्र ह्या सगळ्या गुणधर्मांमुळे गैरमार्गाने मिळवलेलं उत्पन्न किंवा काळ्या धनाच्या उलाढालींमध्ये सोन्याला फार महत्त्व आहे.

सर्वसामान्यांमध्ये सोन्याचे दागिने घेणे म्हणजे सोन्यातील गुंतवणूक असा एक फार चुकीचा समज दिसून येतो. दागिने करणे आणि ते वापरणे यात चुकीचे काही नाही, तो प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. मात्र तो सोन्याचा उपभोग किंवा वापर झाला, त्याला ‘गुंतवणूक’ म्हणता येणार नाही. कुठलाही दागिना खरेदी करून आपण सोनाराच्या दुकानाबाहेर पाऊल टाकताक्षणीच त्या दागिन्याचे मूल्य २०-२५% नी घटलेले असते. आपण १ लाखाला घेतलेला दागिना समोरच्याच सोनाराकडे विकायला नेल्यास ७५-८० हजारापेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही. हे म्हणजे गुंतवणूक म्हणून आयुर्विम्याच्या पॉलिसी घेण्यासारखे झाले. तुम्ही २० हजाराचे ५ हप्ते भरल्यानंतर पाचव्या वर्षी पॉलिसी बंद केल्यास भरलेल्या १ लाखातील जेमतेम ५०-५५ हजारच परत मिळू शकतात. सुरुवातीलाच एवढ्या नुकसानीत ढकलणारी कुठलीच योजना चांगली गुंतवणूक असू शकत नाही.

गुंतवणूक म्हणून कुठलीही गोष्ट करताना त्यातून जास्तीत जास्त परतावा मिळवणे हे प्राधान्य, प्रमुख उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यामुळे सोन्याकडे जर गुंतवणूक म्हणून बघायचे असेल तर चोख सोन्याचाच विचार केला पाहिजे. त्यासाठी प्रमाणित शुद्ध सोन्याची नाणी किंवा बिस्किटे अशा स्वरुपात खरेदी करता येऊ शकते.

अर्थात सोनं असं खरेदी करून साठवून सुरक्षित ठेवणं हीच एक फार मोठी जोखीम आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सोन्यात गुंतवणूक करणे हे सुटसुटीत आणि सुरक्षित मानले जाते. त्यासाठी ४-५ वर्षांपूर्वीपर्यंत Gold ETF (Equity Traded Funds) या म्युच्युअल फंडसदृश योजनांचा वापर करावा लागायचा. मात्र आता सरकारी सुवर्णरोखे (Sovereign Gold Bonds) हा अधिक आकर्षक पर्याय उपलब्ध झाला आहे.

गुंतवणूकदाराला हे सुवर्णरोखे सोन्याच्या विद्यमान किमतीने विकत घेता येतात आणि त्यांच्या मॅच्युरिटीच्या वेळी तत्कालीन सोन्याच्या किमतीएवढी रक्कम परत मिळते. हेच खरे सोने घेऊन ५-७ वर्षं वागवले असते तर झाले असते. मात्र या सुवर्णरोख्यांवर वार्षिक २.२५% व्याजही मिळते, जे नाणी किंवा बिस्किटांवर मिळू शकत नाही. हे रोखे रिझर्व बँकेने काढलेले असल्यामुळे त्याची पत सर्वोत्तम आहे. ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सुचीकृत केलेले (NSE listed) असल्यामुळे आपण ते तिथूनही खरेदी करू शकतो किंवा मॅच्युरिटी आधी विकू शकतो. १०-१५ वर्षांनी मुलांच्या लग्नाला लागतील म्हणून थोडे थोडे करून सोने जमवणाऱ्या सर्व पालकांसाठी हा पर्याय सर्वोत्तम आहे.

हे सगळे करताना अजून एका गोष्टीचा विचार केला पाहिजे ते म्हणजे आपण सोने किती घ्यावे. दर महिन्याला न चुकता २-५ ग्रॅम सोने घेणारे एक तरुण उच्चशिक्षित जोडपे आम्हाला एकदा भेटायला आले होते. त्यावेळी त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओतील ७५% मूल्य रिअल इस्टेटमधे, २०% सोन्यात आणि उरलेले ५% बँक मुदतठेव, इन्शुरन्स पॉलीसी अशा गोष्टींमध्ये होते. अर्थात आता ‘अर्थसाक्षर’ झाल्यामुळे अर्थातच त्यांच्या गुंतवणुकीच्या सवयी बदलल्या आहेत. पण असेही लोक असतात.

आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओच्या परताव्यात सोने स्थैर्य देऊ शकते. तसेच कमालीच्या अस्थैर्याची परिस्थिती निर्माण झाली – युद्ध, आर्थिक मंदी, सरकारी दिवाळखोरी किंवा तत्सम – तर अशा काळात इतर कुठल्याही गुंतवणूक पर्यायापेक्षा सोन्यात जास्त परतावा मिळेल. त्यादृष्टीने आपल्या संपूर्ण गुंतवणुकीतील ५-१०% भाग हा सोन्यात असायला हरकत नाही. मात्र त्यापेक्षा जास्त भाग आपल्या आर्थिक नियोजनाला हानिकारकच ठरत असतो.

 

---प्राजक्ता कशेळकर